तुरीच्या दरात काहीशी घट
कृषी सेवक I ३ डिसेंबर २०२२ I सरकारने तूर आयातीसाठी पायघड्या घातल्या आहेत. त्यामुळे आफ्रिकेतील देशांमधून तूर आयात वाढत आहे. सध्या आफ्रिकेतील देशांमध्ये नवी तूर बाजारात येत असून लगेच भारतात निर्यात केली जात आहे. या मालाची उपलब्धतता भारतीय बाजारपेठेत वाढल्याने दरही काहीसे नरमले आहेत. म्यानमारध्येही तुरीच्या दरात काहीशी घट झाली आहे.
मागील महिन्यात म्यानमारच्या तुरीचे दर प्रतिक्विंटल सरासरी ७५०० रुपयांच्या दरम्यान होते. ते आता ७ हजार रुपयांपर्यंत नरमले आहेत. म्यानमारप्रमाणेच आफ्रिकेच्या तुरीचे दरही क्विंटलमागे ५०० रुपयाने नरमल्याचे दिसत आहे. म्यानमारमध्ये नव्या तुरीची फेब्रुवारी महिन्यात काढणी सुरु होईल. पण आफ्रिकेच्या तुरीचा दरावर दबाव जाणवत आहे.
देशातही तुरीच्या बाजारावर आयात आणि स्थानिक उत्पादनाचा परिणाम जाणवत आहे. त्यामुळे सरासरी दर ६ हजार ७०० ते ७ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. मार्चपासून म्यानमारची तूर बाजारात येईल. तसेच स्थानिक बाजारातही तुरीची आवक वाढलेली असेल. त्यामुळे या बाजारात पुरवठा वाढेल. मात्र यंदा देशातील तूर उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे.