सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस-वेसाठी शेतजमिनीला मूल्यांकन वाढीची मागणी

सुरत-नगर-चेन्नई एक्स्प्रेस-वे ग्रीनफिल्ड महामार्गासाठी (Chennai Surat Highway) संपादित केल्या जाणाऱ्या जमीन (Land Acquisition) नुकसान भरपाईबाबत मांजरसुंबा (ता. नगर) गावातील शेतकऱ्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.

 

या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सीएमओ कक्षात निवेदन दिले. मांजरसुंबा येथील शेतकऱ्यांना शेजारी असलेल्या पिंपळगाव माळवी गावातील जमीन मूल्यांकनानुसार मोबदला मिळावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

 

निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की प्रस्तावित सुरत- नाशिक- नगर- चेन्नई ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस-वेसाठी मांजरसुंबा हद्दीतील शेतजमिनी संपादित होण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 

संपादन होत असताना मांजरसुंबा गावातील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. मांजरसुंबा गावाचे २०२२-२३ मधील जमिनीचे शासकीय मूल्यांकन २ लाख ९५ हजार प्रतिहेक्टर एवढे कमी दाखविले आहे. जमीन संपादित करताना उपरोक्त मूल्यांकनानुसार शेतकऱ्यांना मोबदला दिला गेल्यास तो अत्यंत तुटपुंजा होईल.

 

मांजरसुंबा गाव नगर शहर व औद्योगिक वसाहतीच्या जवळ असणारे गाव असल्याने, या ठिकाणचे जमिनीचे प्रत्यक्ष मूल्यांकन खूप जास्त आहे. गावात सर्वच शेती बागायत आहे. वरील शासकीय मूल्यांकन दराने जमिनी संपादित झाल्यास जमिनीचे मूल्यांकन अतिशय कमी मिळून तो शेतकऱ्यांवर अन्याय होईल असे शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.