किटनाशकांच्या ऑनलाईन विक्रीला परवानगी

कृषी लक्ष्मी I ३० नोव्हेंबर २०२२ I केंद्र सरकारने किटकनाशकांची ऑनलाईन विक्री करण्याला परवानगी दिली आहे. त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांना ॲमेझॉन, फ्लिफकार्टसारख्या इ-कॉमर्स वेबसाईटवरून किटकनाशकांची थेट खरेदी करण्याचा मार्ग मोकळा होईल. कृषी रसायन उद्योगाने या निर्णयाचे स्वागत केले आहे.

या निर्णयाचा उद्योग आणि शेतकरी या दोन्ही घटकांना फायदा होईल, असे म्हटले आहे. शेतकऱ्यांना ऑनलाईन खरेदीमुळे किटकनाशकांचे अनेक पर्याय उपलब्ध होतील. सध्या कृषी सेवा केंद्रातून शेतकरी किटकनाशके खरेदी करतात. कमिशनच्या हव्यासापोटी कमी गुणवत्तेची किंवा बनावट उत्पादने शेतकऱ्यांच्या गळ्यात मारण्याचा प्रयत्न अनेक ठिकाणी होतो. तसेच किंमतीतही एकवाक्यता नाही. ऑनलाईन खरेदीमुळे शेतकऱ्यांना गुणवत्तेची हमी मिळू शकते, असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले. सध्या देशातील कृषी रसायने उद्योगाची उलाढाल ८६ हजार कोटींच्या घरात आहे. पण सध्या कृषी रसायनांची ऑनलाईन विक्री नगण्य आहे.