तूर आणि हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव

कृषी लक्ष्मी I २८ नोव्हेंबर २०२२ I तूर हे खरिपातलं महत्त्वाचं कडधान्य पीक आहे. तर हरभरा हे रब्बीतलं. या दोन्ही पिकांवर मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. परतीचा पाऊस लांबल्याने यंदा रब्बीत हरभरा लागवडीला उशीर झाला. सध्या पीक रोपावस्थेत आहे.

परंतु राज्यात काही ठिकाणी विशेषतः विदर्भातील काही भागात पीकवाढीच्या सुरुवातीच्या टप्प्यातच मर रोगाचा प्रादुर्भाव दिसतोय. तीच स्थिती तुरीची मराठवाड्याच्या काही भागात आहे. तूर पीक सध्या वाढीच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजेच फुले लागण्याच्या आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. शेंगा पक्व होण्याच्या कालावधीत मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात ३० ते ४० टक्के घट येते, असे तज्ज्ञांनी सांगितले. शेतकऱ्यांनी मर रोग व्यवस्थापनासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, असा त्यांचा सल्ला आहे.