इंद्रधनुष्य’ युवक महोत्सवात विद्यापीठाला ४ पदके
कृषी लक्ष्मी | १२ नोव्हेंबर २०२२ | राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात झालेल्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठीय इंद्रधनुष्य युवक महोत्सवात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला एक सुवर्ण, एक रौप्य व दोन कास्य पदक असे एकूण चार पदके प्राप्त झाली आहेत.
राहुरी येथे झालेल्या इंद्रधनुष्य युवक महोत्सवात अकृषी, कृषी, आरोग्य, विज्ञान तंत्रज्ञान आणि मुक्त विद्यापीठ अशा एकूण २१ विद्यापीठांनी सहभाग घेतला होता. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला प्रथमच एवढया मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे. वादविवाद साहित्य प्रकारात चंचल धांडे (मु.जे. महाविद्यालय, जळगाव) व सारांश सोनार (सामाजिक शास्त्र प्रशाळा, कबचौ उमवि) यांच्या संघाला सुवर्णपदक प्राप्त झाले. संगीतामधील तालवाद्य एकल या कला प्रकारात यज्ञेश माळी (मु.जे. महाविद्यालय, जळगाव) याला रौप्य तर ललित कलामधील माती कला या प्रकारात देवा सपकाळे (मु.जे. महाविद्यालय, जळगाव) आणि स्थळ छायाचित्रण कला प्रकारात चैतन्य कोळी (प्रताप महाविद्यालय, अमळनेर) या दोघांना कास्य पदक प्राप्त झाले. विद्यापीठाचे विविध कला प्रकारात ३१ विद्यार्थी आणि ७ साथीदार असे एकूण ३८ जण सहभागी झाले होते. तर संघासोबत व्यवस्थापक म्हणून प्रा. विजय लोहार (मु.जे. महाविद्यालय, जळगाव) व महिला संघ व्यवस्थापक म्हणून डॉ. रूपाली चौधरी (बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगाव) यांचा सहभाग होता. याशिवाय नृत्यदिग्दर्शक प्रा. अजय शिंदे, संगीत प्रशिक्षक कपील शिंगाणे, देवेंद्र गुरूव, कुलदिप भालेराव, प्रसाद कासार, भाग्यश्री पाटील, तेजस मराठे आणि मधुरा इंगळे यांचा सहभाग होता. पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ. सुनील कुलकर्णी यांनी अभिनंदन केले.
संघ महोत्सवाला पाठविण्यापूर्वी या विद्यार्थ्यांना राजू बावीस्कर, डॉ. आशुतोष पाटील, अपर्णा भट, नाना सोनवणे, आणि पियुष बडगुजर यांनी प्रशिक्षण दिले होते.