सोयाबीनला सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपये भाव

कृषी लक्ष्मी I ७ डिसेंबर २०२२ I देशात आजही सोयाबीनचे दर सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान टिकून होते. आंतरराष्ट्रीय बाजारात काहीशी सुधारणा दिसत आहे. मात्र त्याचा प्रत्यय देशातील बाजारात आज दिसला नाही. दुसरीकडे जगातील आघाडीच्या सोयाबीन उत्पादक ब्राझीलमध्ये ९१ टक्के सोयाबीन लागवड पूर्ण झाली. मात्र ब्राझीलमधील काही भागांमध्ये सध्या उष्ण आणि कोरडे हवामान आहे. त्यामुळे येथील सोयाबीन पिकाची भीस्त डिसेंबरमधील पावसावर आहे. डिसेंबरमध्ये पावसाने खंड दिल्यास आंतरराष्ट्रीय बाजारात त्याचे पडसाद उमटू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.