देवधाबा येथील ५२ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या

कृषी लक्ष्मी I १२ डिसेंबर २०२२ I मलकापूर तालुक्यातील देवधाबा येथील ५२ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ९ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

देवधाबा येथील ५२ वर्षीय शेतकरी सोपान निना घोंगे यांच्या शेतात मागील एक दोन वर्षांपासून काही पिकले नाही त्यामुळे आलेली आर्थिक अडचण, त्यातच मुलांचे शिक्षण व उपवर असलेल्या मुलीच्या लग्नाकरिता पैशाची असलेली अडचण या कारणाने शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरी दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.

त्यांची पत्नी दुपारी शेतातून घरी आल्यानंतर सदर घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती ग्रामस्थांना मिळताच त्यांनी तात्काळ त्यांचे घराकडे धाव घेतली. दरम्यान त्यांना मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन केला. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.