प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सन 2022-23 रब्बी हंगाम

कृषी लक्ष्मी | २५ नोव्हेंबर २०२२ | केंद्र शासनाने रब्बी हंगाम 2022-23 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना भारतीय कृषी विमा कंपनी लि. मुंबई यांच्या सहकार्याने जळगाव जिल्हयात राबविण्यात येत आहे. अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिके घेणारे ( कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह ) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे.

 

बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विहीत मुदतीपुर्वी नजीकच्या बँक / आपले सरकार सेवा केंद्रावर विमा हप्त्यासह / कागदपत्रासह विमा प्रस्ताव सादर करावा. कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी न होण्याचा पर्याय उपलब्ध आाहे. शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होणेबाबत घोषणापत्र हंगामाच्या आधी किंवा योजनेतील सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस अगोदर देणे अपेक्षित आहे. योजनेत सहभागी होण्याच्या मुदतीच्या सात दिवस अगोदर शेतकऱ्यांचे घोषणापत्र प्राप्त झाल्यास कर्जदार शेतकऱ्यांना पुढील हंगामा करीता योजनेच्या सहभागातुन वगळण्यात येईल. जे कर्जदार शेतकरी स्वत:च्या स्वाक्षरीसह योजनेत सहभागी न होणेबाबत घोषणापत्र देणार नाहीत त्या सर्व शेतकऱ्यांना योजनेमध्ये सहभाग बंधनकारक समजला जाईल.

 

योजनेंतर्गत समाविष्ट पिके, विमा संरक्षित रक्कम व शेतकऱ्यांनी भरावयाचा पीक विमा हप्ता तपशील

1) गहु बा. – विमा संरक्षित रक्कम रु. 30000/-, शेतकरी हिस्सा प्रति हे. – 450/-

2) ज्वारी बा. विमा संरक्षित रक्कम रु. – 24000/-, शेतकरी हिस्सा प्रति हे. – 360/-

3) ज्वारी जि. विमा संरक्षित रक्कम रु. – 24000/-, शेतकरी हिस्सा प्रति हे. – 360/-

4) हरभरा – विमा संरक्षित रक्कम रु. – 24000/-, शेतकरी हिस्सा प्रति हे. – 360/-

5) उ. भुईमूग – विमा संरक्षित रक्कम रु. – 35000/-, शेतकरी हिस्सा प्रति हे. – 525/-

6) र. कांदा – विमा संरक्षित रक्कम रु. – 60,000/-, शेतकरी हिस्सा प्रति हे. – 3000/-

प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2022 करीता कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभागी होण्याची अंतिम मुदत पिकनिहाय र. ज्वारी करीता 30 नोव्हेंबर, 2022, गहु, हरभरा, र. कांदा पिका करीता 15 डिसेंबर, 2022, उ. भुईमूग पिका करीता 31 मार्च, 2023 अशी . नैसर्गिक आपत्तीपासून नुकसान टाळण्यासाठी पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

संपर्कसाठी

1) आपल्या तालुक्यातील नजीकच्या जिल्हा मध्यवर्ती सहाकारी बँक, सर्व राष्ट्रीयकृत बॅक,

2) तालुका कृषि अधिकारी कार्यालय ( सर्व तालुका), जिल्हा जळगाव,

3) उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालय, जळगाव / पाचोरा/अमळनेर, जिल्हा जळगाव,

4) जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, जळगाव आकाशवाणी शेजारी प्रशासकीय इमारत, जळगाव,

5) भारती कृषि विमा कंपनी लि. मुबंई टोल फ्री क्र. 1800 419 5004

6) आपले सरकार सेवा केंद्र, सर्व ( सी.एस.सी.केंद्र), जिल्हा जळगाव.