कांद्याच्या दरात आणखी घसरण

कृषी लक्ष्मी | २४ नोव्हेंबर २०२२ | कांद्याच्या दरात गेल्या आठवड्यापासून सातत्याने घसरण होत आहे. यावर्षी एप्रिल महिन्यापासून ते जवळपास सप्टेंबर महिन्यापर्यंत शेतकऱ्यांनी कांदा अतिशय कवडीमोल दरात विकला होता. ऑक्टोबर मध्ये मात्र कांदा दरात थोडीशी वाढ झाली.

संपूर्ण महिना कांदादरातील वाढ कायम होती अन नोव्हेंबरच्या सुरुवातीला कांदा दरात अतिशय विक्रमी आणि या हंगामातील सर्वोच्च बाजारभावाची नोंद झाली. 15 नोव्हेंबर पर्यंत राज्यात 2500 रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा कांद्याला सरासरी दर मिळत होता आणि अनेक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा 3500 प्रतिक्विंटल पर्यंतच्या कमाल बाजारभावात विकला गेला. साहजिकच यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत होता.

मात्र गेल्या आठ दिवसांपासून कांदा दरात मोठी घसरगुंडी झाली आहे. कांदा आठ दिवसातच शिखरावरून जमिनीवर आला आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. अहमदनगर जिल्ह्यातही कांदा दरात घसरण झाली आहे. जिल्ह्यातील नेवासा तालुक्याच्या घोडेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आठ दिवसात कांदा एक हजार रुपयांपेक्षा अधिक घसरला आहे.