खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना
कृषी लक्ष्मी I २० डिसेंबर २०२२ I राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशीपालन) कार्यान्वित झाली आहे. या योजनेचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केली आहे. अर्जदार साक्षर असावा, स्वतःची शेती असल्यास प्राधान्य, वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे, मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहील, केंद्रचालक प्रगतिशील मधपाळ, संस्था व्यक्ती प्रशिक्षणासाठी पात्रता : किमान दहावी उत्तीर्ण, वय २१ वर्षांपेक्षा जास्त असावे.
अर्जदार व्यक्तीच्या नावे किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान एक एकर शेत किंवा भाडेतत्त्वावर घेतलेली शेतजमीन असावी, लाभार्थ्याकडे मधमाश्यापालन प्रजनन व मध उत्पादनाबाबत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी. केंद्रचालक संस्था प्रशिक्षणासाठी पात्रता : संस्था नोंदणीकृत असावी, संस्थेच्या नावे मालकीची किंवा दहा वर्षांसाठी भाडेतत्त्वार घेतलेली किमान एक एकर शेतजमीन असावी. प्रशिक्षण केंद्र चालविण्यासाठी संस्थेच्या नावे किंवा भाडेतत्त्वावर घेतलेली किमान एक हजार चौरसफूट सुयोग्य इमारत असावी, संस्थेकडे मधमाश्यापालन प्रजनन व मध उत्पादनाच्या बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले सेवक असावेत.
मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरूपात ५० टक्के अनुदान व ५० टक्के स्वगुंतवणूक, शासनाच्या हमीभावाने मध खरेदी, विशेष/छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाश्या संरक्षक व संवर्धनाची जनजागृती.
अटी व शर्ती : लाभार्थी निवडप्रक्रियेनंतर प्रशिक्षणापूर्वी मध व्यवसाय सुरू करण्यासाठी मंडळास बंधपत्र लिहून देणे अनिवार्य राहील. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहील. जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार व होतकरू शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.