भारतीय मसाल्यांना जागतिकस्तरावर मोठी मागणी -डॉ. दिनेशसिंह बिष्ट

कृषी लक्ष्मी I २० डिसेंबर २०२२ I जमिनीतील गुणधर्मामुळे भारतीय मसाल्यांना वेगळा गंध मिळतो. त्यामुळे भारतीय मसाल्यांना जागतिकस्तरावर मोठी मागणी आहे. परिणामी शेतकऱ्यांनी मसाला पिकांचे उत्पादन आणि प्रक्रिया यावर भर दिल्यास त्यांची आर्थिकस्थिती बदलू शकते,’’ असे प्रतिपादन भारतीय मसाले महामंडळाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दिनेशसिंह बिष्ट यांनी केले.

मसाले महामंडळ (भारत) तसेच विडूळ फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्‍त सहकार्याने यवतमाळ विडूळ येथे आयोजित हळद लागवड व प्रक्रिया उद्योग तसेच आयात-निर्यात विषयक कार्यशाळेत ते बोलत होते.

कार्यशाळेला जिल्हाधिकारी अमोल येडगे, आमदार नामदेव ससाणे, तंत्र अधिकारी श्रीराम शिरसाठ, मसाले महामंडळाच्या उपसंचालक डॉ.ममता रूपोलिया, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ डॉ. विजय काळे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रशांत नाईक, उमरखेड तालुका कृषी अधिकारी गंगाधर बळवंतकर, तज्ज्ञ डॉ.स्नेहलता भागवत, सचिन माळकर, केव्हीके प्रमुख शिवाजी नेमाडे, सहाय्यक प्राध्यापक अंजली गहरवार, संदीप कोरडे यांची यावेळी उपस्थिती होती.

 

उमरखेड तालुक्‍यातील विडूळ परिसरात मोठ्या प्रमाणावर पानवेलीचे मळे आहेत त्यासोबतच हळद लागवड क्षेत्रही अधिक आहे. या शेतकऱ्यांनी या पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत प्रक्रियेवर भर द्यावा, असे आवाहन यावेळी उपस्थितांनी केले.