केंद्रीय कृषीमंत्री तोमर यांच्या हस्ते “कृषी निवेश पोर्टल”चे उद्घाटन

कृषी लक्ष्मी I ६ डिसेंबर २०२२ I केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज नवी दिल्ली येथे बिल आणि मेलिंडा गेट्स फौंडेशन या संस्थेच्या सह-अध्यक्ष मेलिंडा गेट्स यांच्यासमवेत बैठक घेऊन चर्चा केली. या बैठकीत, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने तयार केलेल्या कृषीविषयक गुंतवणूकीसंदर्भातले “कृषी निवेश पोर्टल पोर्टल”चे तोमर यांनी उद्घाटन केले.यावेळी ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, केंद्र सरकारने महिला शेतकऱ्यांच्या कल्याणावर संपूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. देशातील कृषी क्षेत्रासमोर अनेक आव्हाने उभी आहेत आणि त्यांना तोंड देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार सातत्याने प्रभावीपणे कार्य करत आहे असे ते म्हणाले.

आपल्या देशात लहान शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांचे बळ वाढवले तर कृषी क्षेत्राचे सामर्थ्य वाढेल आणि त्यातून कृषी उत्पादन देखील वाढेल असा सरकारचा विश्वास असल्यामुळे सरकार त्या दिशेने कार्य करत आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री तोमर यांनी दिली.

ते म्हणाले की कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीचे प्रमाण आणखी वाढवण्याच्या उद्देशाने सरकारने आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत कृषी आणि संबंधित क्षेत्रासाठी दीड लाख कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजची तरतूद केली आहे.