कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही- उपमुख्यमंत्री

कृषी लक्ष्मी । १ जानेवारी २०२३ ।कापसाची खरेदी हमी भावापेक्षा कमी होत असेल तर शासन त्यात मध्यस्थी करून आवश्यकता पडल्यास अधिकची केंद्रे तयार करेल. कुठल्याही परिस्थितीत कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत 259 अन्वये मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तरात दिली.

विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी हा प्रस्ताव मांडला होता. यावेळी सदस्य एकनाथ खडसे, प्रवीण दरेकर, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, ॲड. अनिल परब, आमश्या पाडवी, सचिन अहिर, अमोल मिटकरी, प्रसाद लाड, सुधीर तांबे, अभिजित वंजारी, राजेश राठोड, महादेव जानकर, चंद्रशेखर बावनकुळे, प्रज्ञा सातव, नरेंद्र दराडे यांनी या चर्चेत सहभाग घेतला.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस पुढे म्हणाले, राज्य सरकारने मंत्रिमंडळ गुंतवणूक समितीच्या दोन बैठका घेतल्या असून या माध्यमातून 95 हजार कोटी रूपयांच्या गुंतवणुकीला मान्यता दिली आहे. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मागील पाच महिन्यात 6195 कोटी रूपये दिले आहे.

याव्यतिरिक्त कर्जमाफीपोटी 2400 कोटी प्रोत्साहन भत्ता आणि भूविकास बँकेच्या कर्जमाफीसाठी 964 कोटी रूपये देण्यात आले. असे एकूण 9559 कोटी रुपये शेतकऱ्यांना विविध योजनाच्या माध्यमातून देण्यात आले. त्याचबरोबर एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुप्पट पैसे शेतकऱ्यांना यावेळी देण्यात आले असून हे देशात पहिल्यांदाच महाराष्ट्रात झाले आहे. येत्या काळात शेतकऱ्यांना अधिकची मदत मिळणार आहे, असे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.