किसन वीर साखर कारखान्याकडून उसास प्रतिटन २ हजार ५०० रुपये उचल

कृषी लक्ष्मी I २ डिसेंबर २०२२ I सध्या साखर कारखाने सुरु झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना उसाचा दर किती मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. आता भुईंज (ता. वाई) येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना व किसन वीर-खंडाळा कारखान्याकडे गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये गाळपाकरिता येणाऱ्या उसास प्रतिटन २ हजार ५०० रुपये एवढी पहिली उचल दिली जाणार आहे.

याबाबतची माहिती कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंद पाटील यांनी दिली. किसन वीर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये किसन वीर व खंडाळा कारखान्याकडे येणाऱ्या उसाला प्रतिटन २ हजार ५०० रुपये पहिली उचल देण्याचा निर्णय झाला आहे. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील दैनिकामध्ये ‘किसन वीर’ची पहिली उचल प्रतिटन २ हजार ३५० रुपये प्रसिद्ध करण्यात आली होती.

या वृत्तामुळे ‘किसन वीर’ व खंडाळा कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता, असे आमदर पाटील यांनी म्हटले आहे. तसेच गळीत हंगामाच्या अखेरीस एफआरपीनुसार जो अंतिम दर निघेल त्यानुसारच किसन वीर कारखान्याचा अंतिम दर राहणार असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले आहे.