भीमा पाटस कारखान्यात १९ हजार ५६० मॅट्रिक टन उसाचे गाळप

कृषी लक्ष्मी I २८ डिसेंबर २०२२ I दौंड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्काचा असलेला भीमा पाटस गेल्या तीन वर्षांपासून बंद होता. आता हा कारखाना सुरू झाला आणि क्षमतेने गाळपास सुरुवात झाल्याने ऊस उत्पादक शेतकरी समाधानी आहेत. त्यांना मोठा दिलासा मिळाला. हा कारखाना सुरू होणार की नाही, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम होता, मात्र आता तो सुरु झाला आहे.

भीमा पाटस कारखान्याचे अवघ्या आठ दिवसात १९ हजार ५६० मॅट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. तर ८ हजार १२५ साखर पोत्यांचे उत्पादन निघाले आहे. कारखान्याचा गळीत हंगाम १५ डिसेंबर २०२२ रोजी ऊस मोळी टाकून गाळप हंगामाची सुरुवात करण्यात आली होती. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे गाळप चालू बंद होत असल्याने अडचणी निर्माण होत होत्या.

असे असताना मात्र आता कारखाना सुरु झाला आहे. आता दिवसाला तीन ते साडेतीन हजार मॅट्रिक टन उसाचे गाळप होत आहे. तर सरासरी ७.८० टक्के साखर उतारा निघत आहे. यंदाचा चालू गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने चालवण्याचा कारखाना व्यवस्थापकांचा प्रयत्न आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाचा पहिला हप्ता २५०० रुपये जाहीर करण्यात आला आहे.