देशी गायींच्या खरेदीवर 25 हजार रुपयांचे अनुदान

कृषी लक्ष्मी I २५ डिसेंबर २०२२ Iसध्या हवामानात सातत्यानं बदल होत आहेत. या बदलाचा शेती क्षेत्रावर मोठा परिणाम होताना दिसत आहे. तसेच शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील वाढला आहे. सातत्यानं खतांच्या बियाणांच्या किंमती वाढत आहेत. उत्पादन खर्चाच्या मानाने शेतीतून नफा मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्याचं आवाहन हरियाणा सरकारनं केलं आहे.

नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हरियाणा सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना देशी गायींच्या खरेदीवर 25 हजार रुपयांचं अनुदान दिलं जाणार असल्याची माहिती कृषीमंत्री जे पी दलाल यांनी दिली.

काल (23 डिसेंबर) राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा करण्यात आला. या कृषी दिनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणाचे कृषीमंत्री जे पी दलाल यांनी शेतकऱ्यांना गायीच्या खरेदीसाठी 25 हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. किमान आपल्या उपजीविकेसाठी तरी शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेतीचा अवलंब करावा असं आवाहन मंत्री दलाल यांनी केलं आहे.