रब्बी हंगामातील कांदा लागवड देईल चांगले उत्पन्न
कृषी लक्ष्मी | १५ नोव्हेंबर २०२२ | राज्यात रब्बी हंगामात प्रामुख्याने कांदा लागवड होते. या हंगामाचे उत्पादन तसेच कांद्याची साठवण क्षमता उत्कृष्ट असते. या कांद्याचे चांगले उत्पादन घेण्यासाठी सुधारित पद्धतीने व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचे आहे.रब्बी हंगामात कांदा लागवडीसाठी “एन-2-4-1′ ही जात निवडावी. ही जात रब्बी हंगामात उच्च उत्पादनक्षमतेसाठी (350-450 क्विं/हे.) तसेच उत्तम साठवणूक क्षमतेसाठी (6-8 महिने) चांगली आहे. कांदा मध्यम चपटगोल आकाराचा असून, डेंगळे येणे, डबल कांदा इत्यादी विकृतीत प्रतिकारक आहे.
शेतकरी या वाणांस गरवा, भगवा अथवा गावरान या नावाने ओळखतात.शेतकरी स्वतःच या जातीचे बीजोत्पादन करतात.व्यवस्थापनाची सूत्रे1) नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर दर्जेदार रोपांची लागवड करावी.
लागवड 15 डिसेंबरपर्यंत पूर्ण करावी.2) लागवड करताना उत्तम निचऱ्याची, मध्यम खोलजमिनीची निवड करावी. विशेषतः सपाट वाफ्यात रोपांची कोरड्यात 15×10 सें.मी. अंतरावर दाट लागवड करावी. त्यानंतर हळवेपणाने पाणी द्यावे. त्यानंतर आंबवणी करताना न चुकता नांगे भरावेत.3) लागवडीनंतर एक आठवड्यानंतर शिफारशीत
तणनाशक फवारून गरजेनुसार एक महिन्यानंतर हात खुरपणी करून नत्रखताचा वर हप्ता द्यावा. 4) लागवडीनंतर 10, 25, 40 व 55 दिवसांनी नियमितपणे कीड, रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन कीडनाशकाच्या चार फवारण्या द्याव्यात. 5) लागवडीनंतर 55 दिवसांपर्यंत 8 ते 10 दिवसांच्या अंतराने नियमितपणे पाणी द्यावे. लागवडीनंतर 90 दिवसांनी कांद्याचे पाणी तोडावे. 6) लागवडीनंतर 110 दिवसांनंतर या जातीची पात नैसर्गिकपणे पडावयास सुरवात होते. कांद्याच्या माना 50 टक्के नैसर्गिकरीत्या पडल्यानंतर कांद्याची काढणी
करावी. कांद्याची पात न कापता, पातीसकट कांदा वाफ्यात अशा रीतीने पसरवून ठेवावा की एका कांद्याचा गोट दुसऱ्या कांद्याच्या पातीने झाकला जाईल. कांद्याची पात शेतामध्ये 3 ते 5 दिवसांकरिता वाळवावी. त्यानंतर वाळलेली कांद्याची पात गोटापासून एक इंच अंतराची मान ठेवून पिळा देऊन कापावी. त्यानंतर कांदा हा झाडाच्या अथवा छपराच्या सावलीत तीन आठवड्यांच्या कालावधीसाठी पातळ थरात (1-2 फूट) वाळवावा. या काळात कांद्यातील उष्णता निवळून बाहेरून पत्ती सुटते, आकर्षक रंग येतो. त्यानंतर कांद्याची प्रतवारी करून, सडलेले व मोड आलेले कांदे निवडून फेकून द्यावेत.
7) साठवणगृहात मध्यम आकाराचे एकसारखे कांदे ठेवावेत. कांदा साठविण्यापूर्वी दोन दिवसआधी कांदा चाळ झाडून स्वच्छ करावी. मॅन्कोझेबची (3 ग्रॅम प्रति लिटर पाणी) फवारणी करावी.8) साठवणुकीत दर महिन्याला एकदा अशी फवारणी केल्यास साठवणुकीत कांदा सडण्याचे प्रमाण खूपच कमी राहते. पावसाळी वातावरणात साठवणगृहाच्या तळाशी गंधकाची धुरी देण्याने कांदा सडत नाही. साठवणगृहामध्ये एकदा भरलेला कांदा बाहेर काढून हाताळू नये व त्यावरची पत्ती काढून टाकू नये. कांद्याची पत्ती संरक्षकाचे काम करत असल्यामुळे त्याचे जतन करणे अत्यावश्यक आहे. योग्य काळजी घेऊन कांदा साठविल्यास हा कांदा 6 ते 8 महिने उत्तम टिकतो.
बीजोत्पादन करताना…1) 15 नोव्हेंबरपर्यंत अजिबात मोड न आलेल्या कांद्याचे गोट निवडून, लाल कांद्याच्या बीजोत्पादन क्षेत्रापासून सुरक्षित विलगीकरण अंतरावर (साधारण 1.5 कि. मी. दूर) घ्यावे. जेणेकरून कांद्याची जैविक शुद्धता कायम राखली जाईल.2) साधारण दर तीन वर्षांनंतर कांद्याची उत्पादकता, विकृतीची प्रतिकार क्षमता तसेच साठवणूक क्षमतेने घट झाल्यास कृषी विद्यापीठातून एन-2-4-1 या जातीचे मूलभूत बियाणे (ब्रिडर सीड) घ्यावे किंवा माहिती असलेल्या शेतकऱ्यांकडून खात्रीचे गोट वापरून सुधारित बीजोत्पादन घ्यावे.