कलिंगड लागवड
कृषी लक्ष्मी I २३ डिसेंबर २०२२ I उष्ण व कोरडे हवामान, भरपूर सूर्यप्रकाश या पिकास मानवते. कडक उन्हाळयाचा व भर पावसाळ्याचा काळ सोडला, तर कलिंगडाची लागवड वर्षभर कधीही करता येते.
वेलीच्या चांगल्या वाढीसाठी २४ ते २७ अंश सेल्सियस तापमान उपयुक्त ठरते. लागवड शक्यतो जानेवारी महिन्यात करावी म्हणजे उन्हाळ्याच्या तोंडावर याची फळे तयार होत असून त्यांना मागणी अधिक राहते. त्यामुळे बाजारभाव चांगले मिळतात.
– दक्षिण महाराष्ट्रामध्ये कलिंगडाची लागवड ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात करतात व ही फळे नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये तयार होतात. उत्पादन कमी येते. परंतु भाव चांगला मिळतो
– या पिकाला मध्यम काळी आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी, सेंद्रिय पदार्थ भरपूर असणारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू ६.५ ते ७ असावा.
जाती :-
शुगर बेबी, अर्का माणिक, अर्का ज्योती व असाही यमाटो या जातींचा वापर लागवडीसाठी केला जातो. तसेच खाजगी कंपनीच्या शुगर क्वीन, किरण १, किरण २, पूनम, ऑगस्टा या जातींची लागवड बऱ्याच प्रमाणात केली जाते. एकरी ३५० -४०० ग्रॅम बियाणे लागते.
रोपवाटिका :-
– लागवडीपूर्वी बियाण्यास कॅप्टन किंवा कार्बेंडाझीम २.५ ग्रॅम प्रती किलो बियाणे या प्रमाणात चोळावे. कोकोपिट ट्रेमध्ये भरल्यावर बोटांच्या सहाय्याने एक छोटा खड्डा घेऊन प्रत्येक कप्प्यात एक बी पेरून कोकोपिटने झाकून घ्यावे व पाणी द्यावे.सुमारे ८ – १० ट्रे एकावर एक ठेऊन काळ्या पॉलीथीन पेपरने झाकून घ्यावेत. झाकल्यामुळे ओलावा निघून जात नाही. पाणी कमी लागते. उबदारपणा टिकून राहिल्यामुळे बी लवकर उगवून येते.रोपे उगवून आल्यानंतर ३ -४ दिवसांत पेपर काढावा व ट्रे खाली उतरून ठेवावेत.
– मर होऊ नये म्हणून दहाव्या दिवशी कॉपर ऑक्सिक्लोराईड दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी
– साधारणतः १६ ते १८ दिवसांनी पुनर्लागवड करावी.
खत व्यवस्थापन :-
पूर्वमशागत करताना जमिनीत १२ ते १४ गाड्या चांगले कुजलेले शेणखत द्यावे .
– गादीवाफे तयार करताना त्यामध्ये शिफारशीनुसार ,१८:४६:०० -५० किलो ,पोटॅश ५० किलो ,कोसावेट ३ किलो ,फोलिडोल ५ किलोएकरी द्यावे.
– गादीवाफ्यावर ठिबक अंथरल्यावर कलिंगड लागवडीपूर्वी मल्चिंग पेपर (३० मायक्रॉन जाडीचा) अंथरावा. एकरी पेपरचे ४ ते ५ रोल लागतात.रोपांची पुनर्लागवड करण्यासाठी ठिबक सिंचन लॅटरल आणि मल्चिंग पेपर अंथरल्यानंतर कलिंगड लागवडीसाठी वाफ्याच्या मध्यभागी ६० से.मी. अंतरावर १० से.मी. व्यासाची छिद्रे तयार करावीत.
– गादीवाफा ओला करून घ्यावा लागवड वापसा अवस्थेत करावी रोप लावल्यानंतर कडेची माती चांगली दाबून घ्यावी.३ दिवसानी पाणी देऊन घ्यावे.पाणी नियमित द्यावे (पोतानुसार)
– ५ व्या दिवशी ठिबकमधून अक्टरा /अरेवा २५० ग्राम + ब्लू कॉपर- ५०० ग्राम + ह्यूमिक ९९ टक्के ५०० ग्राम द्यावे.
– आवश्यक फवारणी सिलिकॉन ३० मिली १५ लिटर पाण्यात मिसळून लागवडीपासून काढणीपर्यंत २० दिवसाच्या अंतराने फवारणी करावी.
– विद्राव्य खत ठिबकमधून १९:१९:१९ -३ किलो ३ दिवसाच्या अंतराने ७ वेळेस द्यावे (देण्याचा कालावधी लागवडीपासून ५ ते २५दिवस )
– ७ व्या दिवशी फवारणी एम ४५- ३० ग्राम + असाटाफ ३० ग्राम १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
– १५ व्या दिवशी पिवळे चिकट सापळे ५ व निळे चिकट सापळे ५ लावावे चिकट सापळे यावर असलेल्या किडीचा प्रादुर्भाव नुसार फवारणी करावी.
– विद्राव्य खत ठिबकमधून १२:६१:०० -३ किलो ३ दिवसाच्या अंतराने ५ वेळेस द्यावे (देण्याचा कालावधी लागवडीपासून २० ते ३५ दिवस )
– २५ व्या दिवशी मॅग्नेशिअम सल्फेट ५ किलो ठिबकमधून एकरी द्यावे.
– ३० व्या दिवशी कॅल्शिअम नायट्रेट ५ किलो + बोरॉन १ किलो या प्रमाणे द्यावे.
-३५ व्या दिवशी ह्यूमिक ९९ टक्के ५०० ग्राम ठिबकमधून द्यावे.
– विद्राव्य खत ठिबकमधून ००:५२:३४- ३ किलो – ३ दिवसाच्या अंतराने ५ वेळेस द्यावे (देण्याचा कालावधी लागवडीपासून ३६ ते ५० दिवस )
– ५१ व्या दिवशी कॅल्शिअम नायट्रेट ५ किलो + बोरॉन १ किलो या प्रमाणे द्यावे.
– विद्राव्य खत ठिबकमधून किलो १३:००:४५ -३ किलो ३ दिवसाच्या अंतराने ५ वेळेस द्यावे (देण्याचा कालावधी लागवडीपासून ५१ ते ६५ दिवस )
– ६५ व्या दिवशी पोटॅशिअम सोनाईट ५ किलो ठिबकमधून एकरी द्यावे.
रोग व किडी व्यवस्थापन :-
– केवडा / मर – मँकोझेब किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड ,भुरी – डायफेनकोनॅझोल किंवा हेक्झाकोनॅझोल.
-फळमाशी – कीड लागलेली व खाली पडलेली फळे नष्ट करावीत. क्यूल्युरचे एकरी ५ सापळे लावावेत. पिकावर व जमिनीवर मॅलॅथीऑनची ०.१ % फवारणी करावी. रसशोषणाऱ्या किडी – इमिडाक्लोप्रिड (१८.५ एस.सी.). किंवा फिप्रोनील (५ ई.सी.) बुरशीनाशक व कीटकनाशक आलटून पालटून आवश्यकतेनुसार फवारणी करावी.
काढणी व उत्पादन:
– फळे लागल्यानंतर फळांचा पाण्याशी संपर्क येणार नाही
, याची काळजी घ्यावी. पाण्याशी फळांचा संपर्क आल्यास फळे सडतात.
– फळांचा आकार गोलसर व मधे फुगीर तयार होऊन देठ सुकल्यानंतर बोटांच्या मागच्या बाजूने पक्क फळावर वाजवल्यावर डबडब असाआवाज येतो तर अपक्व फळांचा टणटण असाआवाज येतो.कलिंगडाच्या देठाजवळील बाळी सुकते.
– साधारणपणे बियाणे लागवडीपासून ९० ते १२० दिवसांमध्ये फळे काढणीस येतात.
– साधारणतः जातीनिहाय एकरी ३० ते ४९ टन उत्पादन मिळते.