गहू आणि हरभरा या पिकांसाठी १५ पर्यंत मुदत

कृषी लक्ष्मी I ७ डिसेंबर २०२२ I यंदाच्या (२०२२-२३) रब्बी हंगामातपंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत गहू आणि हरभरा या पिकांसाठी गुरुवार (ता.१५)पर्यंत शेतकऱ्यांना विमा अर्ज दाखल करता येतील, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

रब्बी हंगामातील सर्व अधिसूचित पिकांसाठी ७० टक्के जोखीमस्तर निश्‍चित करण्यात आला आहे. पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग यांसारख्या टाळता न येणाऱ्या जोखमींमुळे पिकांच्या उत्पन्नात येणाऱ्या घटीपासून व्यापक विमा संरक्षण मिळणार आहे.

 

परभणी जिल्ह्यात आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि. या विमा कंपनीकडून राबविण्यात येत आहे. प्रतिहेक्टरी विमाहप्ता दर गहू बागायती ६३० रुपये, हरभरा पिकासाठी ५६२ रुपये ५० पैसे, तर उन्हाळी भुईमुगासाठी ६४४ रुपये ५७ पैसे आहे. योजनेत सहभागी होण्यासाठीची कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी अंतिम मुदत गहू बागायत आणि हरभरा या पिकासाठी गुरुवार (ता. १५)पर्यंत, तर उन्हाळी भुईमुगासाठी ३१ मार्च २०२३ ही आहे.