कृषी सेवक I १७ डिसेंबर २०२२ I उन्हाळी हंगामासाठी योग्य शिफारशीत भुईमूग जातींची निवड करावी. वेळेवर पेरणी, तुषार सिंचन पद्धतीचा वापर आणि तणनियंत्रण या बाबींकडे लक्ष दिल्यास उत्पादनामध्ये वाढ मिळवणे शक्य होते.
भुईमूग हे तीनही हंगामामध्ये घेतले जाणारे गळीत धान्य पीक असून, खरिपामध्ये भुईमुगाखाली क्षेत्र अधिक असते. तुलनेने क्षेत्र कमी असूनही उन्हाळी भुईमुगाची उत्पादकता अधिक असते.
अधिक उत्पादकतेसाठी आवश्यक बाबी : स्वच्छ सूर्यप्रकाश, ओलिताची व्यवस्था, जमिनीतील ओलीचे प्रमाण योग्य व प्रमाणशीर, कीडरोग व तणांचा कमी प्रादुर्भाव, योग्य तापमान इ.
जाती :
-जे एल -२२० (फुले व्यास) हीसुद्धा मोठ्या दाण्याची जात असून, जळगाव, धुळे व अकोला जिल्ह्यांसाठी शिफारस आहे.
-जेएल-५०१ हे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीच्या परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांसाठी शिफारशीत आहे.
-प्रामुख्याने पसऱ्या, निमपसऱ्या तसेच उपट्या अशा तीन जाती आहेत. महाराष्ट्रात प्रामुख्याने उपट्या म्हणजेच (इरेक्ट – बंची) प्रकारच्या जातींची लागवड करावी.
-एसबी – ११, टीएजी- २४, फुले उन्नती, टीजी-२६, जेएल -२४ (फुले प्रगती) या जाती निवडाव्यात.
टीपीजी -४१ ही मोठ्या दाण्याची जात असून, पश्चिम महाराष्ट्र, जळगाव, धुळे व अकोला जिल्ह्यांसाठी शिफारस आहे.
-जेएल -७७६ (फुले भारती) या जातीची उत्तर महाराष्ट्रासाठी शिफारस आहे.
-वरील शिफारशीप्रमाणे परिसरात उपलब्ध, उत्पादनक्षमता, उन्हाळी हंगामात वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता या बाबींचा विचार करून जातींची निवड करावी.
पेरणीचा योग्य कालावधी:
-१५ जानेवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत.
जमीन व मशागत :
-नांगरणीनंतर उभी-आडवी वखरणी करून जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या वखरणी किंवा रोटाव्हेटर मारण्यापूर्वी चांगले कुजलेले शेणखत सुमारे २ टन प्रतिएकर याप्रमाणे द्यावे.
-मध्यम प्रकारची, भुसभुशीत, चुना (कॅल्शियम) व सेंद्रिय पदार्थ यांचे योग्य प्रमाण असलेली, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन योग्य समजली जाते.
-जमीन तयार करताना नांगरणीची खोली साधारणत: फक्त १२ -१५ सें.मी. एवढीच राखावी. जास्त खोल नांगरणी केल्यास जमिनीत शेंगा जास्त खोलीवर लागतात. पीक परिपक्वतेनंतर झाडे उपटताना अथवा वखराद्वारे काढताना आऱ्या तुटून शेंगा जमिनीत राहतात. परिणामी उत्पादनात घट येते.
बियाणे प्रमाण :
जात निहाय तसेच दाण्याच्या आकारमानानुसार बियाण्याचे प्रमाण ठरते. कमी आकाराचे दाणे असलेल्या जातींसाठी एकरी ४० किलो, मध्यम आकाराच्या बियाण्यासाठी एकरी ५० किलो , तर टपोऱ्या दाण्याच्या जातीसाठी एकरी ६० किलो बियाणे वापरण्याची शिफारस आहे.
सिंचन व्यवस्थापन :
-पाण्याच्या पाळ्यांचे प्रमाण जमिनीचा प्रकार, मगदूर, सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण, चुनखडीचे प्रमाण यानुसार ठरवावे.
एप्रिल-मे महिन्यांत गव्हाचा गव्हांडा व बारीक काड पिकाच्या ओळीमधील जागेत पातळ थरात पसरून घेतल्यास पाण्याच्या पाळीतील अंतर वाढवता येते.
-ओलीत व्यवस्थापन करताना जमिनीला भेगा पडणार नाही, याची कटाक्षाने काळजी घ्यावी. आऱ्या जमिनीत जाताना तसेच शेंगा पोसताना जमिनीतील ओलाव्याची वाफसा स्थिती राखणे आवश्यक आहे.
-जातीनूसार भुईमुगाचा कालावधी साधारणत: ९० ते ११५ दिवसांचा असू शकतो. उन्हाळी भुईमुगाच्या ओलीत व्यवस्थापनासाठी तुषार सिंचन पद्धतीचा वापर फायद्याचा राहतो.
-पेरणीपूर्वी ओलीत देऊन जमीन भिजवून घ्यावी. वाफसा आल्यावर अथवा जमिनीचा वरचा पापुद्रा सुकल्यावर लगेच पेरणी करावी. पेरणीनंतर ४-५ दिवसांनी पाणी द्यावे किंवा उगवण झाल्यानंतर लगेचच ओलीत करावे.
यानंतर पीक फुलोरा अवस्थेत येईपर्यंत पाण्याचा ताण द्यावा. यादरम्यान जमिनीला भेगा पडलेल्या नाहीत, याची खात्री करावी.
-फुले येण्याच्या अवस्थेपासून (पेरणीपासून २२ -३० दिवस ) ठराविक अंतरानुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. आऱ्या सुटण्याची अवस्था (पेरणीपासून ४०- ४५ दिवस), शेंगा पोसण्याची अवस्था (पेरणीपासून ६५-७० दिवस) या वेळी पाण्याची पाळी चुकवू नये.
हवामान :
पेरणीवेळी रात्रीचे किमान तापमान १८ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असावे.फुलोरा अवस्थेदरम्यान या पिकाला दिवसाचे तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस लागते; अन्यथा फुलधारणा क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. अतिउशिरा पेरणी केल्यास फुलोऱ्याच्या कालावधीत तापमान वाढलेले असते.
आंतर मशागत :
-पेरणीपासून साधारणत: १०-१२ दिवसांनी खांडण्या (तुटाळ्या) भरून घ्याव्यात.
-पेरणीपासून सुरवातीच्या ६ आठवड्यांपर्यंत २-३ डवरणी तसेच १-२ वेळा खुरपणी करावी.
-आऱ्या सुटण्याच्या अवस्थेपासून पिकात आंतरमशागतीची कामे (डवरणी) करू नयेत.
तणनाशकांचा वापर :
तणनाशकांचा वापर आवश्यकता असल्यास करावा.
प्रमाण : फवारणी प्रतिलिटर पाणी
पेंडीमिथॅलीन ७ मि.लि.
सूचना : फवारणी पेरणीनंतर ४८ तासांच्या आत पीक उगवणीपूर्वी जमिनीत भरपूर ओल असताना करावी. त्यामुळे पीक सुरवातीच्या २० ते २५ दिवस तणविरहीत राखता येते.
गवतवर्गीय तणांचा प्रादुर्भाव जास्त असल्यास
प्रमाण : फवारणी प्रतिलिटर
क्विझॉलोफॉफ ईथाईल २ मि.लि.
सूचना : ही फवारणी पेरणीनंतर २० दिवसांनी जमिनीत मुबलक ओलावा असताना करावी.
काही रुंदपानांची तणे तसेच गवतवर्गीय तणे या दोन्हीसाठी, इमॅझीथापर या तणनाशकाचा वापर शिफारस व लेबल क्लेमप्रमाणे करावा.
खत व्यवस्थापन :
-पेरणीवेळी प्रतिएकरी युरिया २५ किलो + सिंगल सुपर फॉस्फेट १२५ किलो + म्युरेट ऑफ पोटॅश ३५ किलो + जिप्सम १५० ते २०० किलो याप्रमाणे द्यावे.
-पेरणीवेळी ४-५ किलो झिंक सल्फेट तसेच बोरॅक्स २ किलो प्रतिएकरी द्यावे.
-पीक आऱ्या सुटण्याच्या अवस्थेत पुन्हा जिप्सम १५० ते २०० किलो प्रतिएकर याप्रमाणे द्यावे. जिप्समच्या वापरामुळे शेंगा चांगल्या पोसून, उत्पादन वाढण्यास मदत होते.