महागाईच्या आकडेवारीत मोठी घसरण

कृषी लक्ष्मी I १५ डिसेंबर २०२२ I महागाईने हैराण झालेल्या सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. नोव्हेंबर महिन्यातील महागाईची आकडेवारी जाहीर झाली आहे. नोव्हेंबरमध्ये जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार महागाईच्या आकडेवारीत मोठी घसरण झाली आहे.

 

महागाईत ही घसरण अन्नपदार्थ, इंधन आणि उत्पादन वस्तूंच्या किमतीत घट झाल्यामुळे झाली आहे.नोव्हेंबर महिन्यात घाऊक महागाईचा दर २१ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला आहे. नोव्हेंबरमध्ये घाऊक किंमत निर्देशांक 5.85 टक्के होता. खाद्यपदार्थांच्या किमतीत झालेली घट, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत झालेली घट आणि उत्पादन वस्तूंच्या किमतीत झालेली घसरण यामुळे महागाईतील ताजी कपात झाली आहे.

नोव्हेंबर 2021 मध्ये घाऊक महागाई दर 14.87 टक्के होता. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई 19 महिने दुहेरी अंकात राहिल्यानंतर ऑक्टोबरमध्ये 8.39 टक्क्यांवर आली होती.