कृषी लक्ष्मी I १९ डिसेंबर २०२२ I एक महत्त्वाचे संशोधन महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी विकसित केले असून नुकतेच सहा पिकांचे नवीन वाण विकसित केले असून यामध्ये हळद, राजमा तसेच ज्वारी, ऊस आणि उडीद व मुग या पिकांचा समावेश आहे. एवढेच नाही तर चार कृषी यंत्र देखील कृषी विद्यापीठाने विकसित केले असून त्यांना देखील आता मान्यता मिळाली आहे.
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे आणि राज्यातील चारही कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानाने तीन दिवसीय संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीची 50 वी बैठक डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती.या बैठकीमध्ये राहुरी कृषी विद्यापीठाने रब्बी ज्वारीचे फुले पूर्वा, राजमाचे फुले विराज, उडीदचे फुले राजन, मुगाचे फुले सुवर्ण, उसाचे फुले 15052 आणि हळद या पिकाचे फुले हरिद्रा हे नवीन वाण विकसित केले असून त्यांच्या प्रसाराला आता मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता राज्यातील शेतकरी बांधवांना या नवीन वाणाची लागवड करता येणे शक्य होईल.
तसेच यंत्रांमध्ये राहुरी कृषी विद्यापीठाचे ट्रॅक्टरचलित फुले सेंद्रिय भरखते देण्याचे यंत्र, ट्रॅक्टरचलित फुले दोन ओळींमध्ये चालणारा फॉरवर्ड रिवर्स रोटावेटर, ट्रॅक्टरचलित फुले केळी खुंट कुट्टी यंत्र, फुले रस काढणी यंत्र हे चार यंत्र देखील विद्यापीठाने विकसित केले असून यांना देखील या बैठकीत प्रसारित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. नक्कीच या यंत्रांचा आणि या वाणाचा शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास हातभार लागेल हे मात्र निश्चित.