कृषी लक्ष्मी | २४ नोव्हेंबर २०२२ | महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख विभागाने यावर एक भन्नाट तोडगा काढला आहे. आता सातबारा उताऱ्याला उपग्रहाद्वारे काढलेल्या नकाशाची जोडणी केली जाणार आहे. यामुळे जमिनीची अचूक मोजणी होणार आहे. सध्या राज्यातील बारामती आणि खुलताबाद या दोन तालुक्यांतील प्रत्येकी दहा गावांमध्ये हा उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली असल्याचे एका मीडिया रिपोर्ट मध्ये सांगितले गेले आहे.
दरम्यान या दोन तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर हे काम सुरू असलं तरीदेखील पुढील दोन वर्षांमध्ये हा उपक्रम राज्यभरात पू्र्ण करण्याचा मानस महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख विभागाचा आहे. यामुळे आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्रात अवकाशातून जमिनीची राखण होणार आहे. उपग्रहाच्या मदतीने जमिनी मोजणी करताना काटेकोरपणा येणार आहे. शेत जमिनीची अचूक मोजणी झाले म्हणजेच शेतकऱ्यांचे एक मोठे टेन्शन कमी होणार आहे.
एखाद्या शेतकऱ्याची जमीन सातबारा उताऱ्यापेक्षा प्रत्यक्ष जागेवर कमी आहे. त्याच्याकडून सातबारा उताऱ्यानुसार जमीन महसूल गोळा केला जात असेल तर त्याच्यावर अन्याय होऊ शकतो. जमीन खरेदीच्या व्यवहारांतही पैशांचा पूर्ण मोबदला अर्थात पूर्ण जमीन ताब्यात आली का याची पडताळणी आवश्यक असते. यावर भूमी अभिलेख व जमाबंदी आयुक्तालयाने अनोखा उपक्रम राबविण्यास सुुरुवात केली आहे. निश्चितच यामुळे शेतकऱ्यांवर होणारा अन्याय कमी होणार आहे.
महाराष्ट्र राज्य भुमिअभिलेख विभागाच्या या नवीन प्रयोगामुळे मोजणीत मदत होणार आहे तसेच अतिक्रमणे रोखता येणार आहेत. एवढेच नाही तर या नकाशांवरून एका शेतकऱ्याच्या हद्दीवरून इतर जमिनींची मोजणी करणे, हद्द ठरविणे शक्य होईल. जीआयएस रेफरन्सिंग मॅपमुळे जमिनीचे नकाशे पाहणे शक्य होईल. सरकारी, तसेच खासगी जमिनींवरील अतिक्रमणे देखील टाळता येणार आहेत.