कृषी लक्ष्मी I १२ डिसेंबर २०२२ I पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात अत्यंत तोकडी रक्कम जमा केली होती. त्यामुळे रविकांत तुपकरांनी आक्रमक पावित्रा घेतला. शेतकऱ्यांचा रोष पाहता पीकविमा कंपनीने राज्यातील कार्यालये बंद केली होती. त्यानंतर तुपकरांनी पुणे येथे कृषी आयुक्तांची भेट घेऊन त्यांना पत्र दिले होते. या पत्राची दखल घेत कृषी आयुक्तांनी पीकविमा कंपनीला कडक आदेश दिले आहेत. सर्व कायालये सुरु करावे आणि शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करुन त्यांना न्याय मदत द्यावी, अशा सूचना कृषी आयुक्तांनी दिल्याने शेतकऱ्यांच्या खात्यात पीकविमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
एआयसी अर्थात भारतीय कृषी विमा कंपनीकडे महाराष्ट्रातील सोळा जिल्ह्यांचे काम आहे. या कंपनीने कृषी विभागाचे पंचनामे ग्राह्य न धरता, कृषी सहायक आणि शेतकऱ्यांची स्वाक्षरी नसलेले पंचनामे परस्पर फिलअप करुन शेतकऱ्यांना अत्यंत कमी मोबदला दिला. प्रिमियम पेक्षाही कमी पैसे मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाल्याने तुपकरांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर संदर कंपनीने तुघलकी निर्णय घेत राज्यातील कार्यालये बंद केली होती. त्यामुळे रविकांत तुपकर यांनी १ डिसेंबर रोजी पुणे येथे कृषी आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याशी या संदर्भात चर्चा करत त्यांना निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेत कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी सदर पीकविमा कंपनीला लेखी कडक आदेश दिले आहे. आपण काम करीत असलेल्या जिल्ह्यातील सर्व तालुका व जिल्हा कार्यालये चालू राहतील याची दक्षता घ्यावी व या कार्यालयातून शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण करावे, स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना अत्यंत कमी नुकसान भरपाई निश्चित केली आहे त्याची फेर पडताळणी करावी व शेतकऱ्यांना न्याय नुकसान भरपाई देण्याबाबत तत्काळ कार्यवाही करावी, असे या आदेशात नमुद आहे. या आदेशानंतर सदर कंपनीने आता कार्यालये सुरु केली असून शेतकऱ्यांच्या खात्यात पीकविमा रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
रविकांत तुपकर यांनी जलसमाधी आंदोलनासाठी मंबईत धडक देण्यापूर्वीच या आंदोलनाची दखल घेत बुलढाणा जिल्ह्यासाठी एका फटक्यात स्थानिक नैसर्गिक आपत्तीचे १ लाख ५४ हजार ७०७ शेतकऱ्यांसाठी १०३ कोटी ५३ लाख ३९ हजार ३४ रुपये मंजूर झाले असून या नुकसान भरपाईचे वाटप सुरु आहे. या १०३ कोटी व्यतिरिक्त आणखी ५६ हजार शेतकऱ्यांचे स्थानिक नैसर्गिक आपत्तीची क्लेम प्रकिया चालू असून १५ दिवसांच्या आत अंदाजे ३५ कोटी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. तर सरकारचे दुसऱ्या टप्प्यातील पैसे आल्यावर पोस्ट हार्वेस्टचे ७० हजार शेतकऱ्यांचे पिकविमा वाटप होणार आहे. तसेच स्थानिक नैसगिर्क आपत्तीमधून अपात्र ठरलेले २५ हजार ९४६ शेतकरी व पोस्ट हार्वेस्ट मध्ये अपात्र ठरलेल्या ४२४२ शेतकऱ्यांचाही विचार केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. एकंदरीत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे आंदोलन आणि पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना न्याय नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे.